आडसमधून दुचाकी लंपास; दुचाकी चोरांचा मोर्चा ग्रामीण भागात?
आडस : येथील साठे चौकात उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने हॅन्डल लॉक तोडून लंपास केल्याची घटना शनिवारी ( दि. १४ ) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दहा-बारा दिवसांपूर्वी वाघोली येथूनही एक दुचाकी चोरी झाली. आडस पोलीस चौकी हद्दीत पंधरा दिवसांच्या आत दोन दुचाकी चोरीच्या घटना घडल्याने या चोरट्यांनी मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
केज तालुक्यातील आडस येथील बालाजी डुमने हे शनिवारी आठवडी बाजार असल्याने साठे चौकात त्यांची दुचाकी क्रमांक एम.एच. ४४ व्ही ५७२७ हिरो स्प्लेंडर हॅन्डल लॉक करुन भाजीपाला घेण्यासाठी बाजारात गेले. बाजार करुन परत आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. कोणी चेष्टा केली अथवा चुकून कोणी नेहली असावी म्हणून वाट पाहिली तसेच इतरत्र शोध घेऊन ही मिळून आली नाही.त्यामुळे धारुर पोलीस ठाण्यात दुचाकी हरवल्याची तक्रार करण्यात आली. येथील पोलीस दूर क्षेत्र ( चौकी ) हद्दीतील वाघोली येथील सचिन शिंदे यांची दुचाकी घरासमोरुन चोरून नेली. यानंतर ही दुसरी घटना घडल्याने दुचाकी धारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.