आठवडाभरापासून गायब असलेला मुलगा परतला काळ बनून! जन्मदात्याच्या डोक्यात फावडा मारुन खून

लोकगर्जनान्यूज
माजलगाव : आठवडाभरापासून मुलगा गायब असल्याची तक्रार वडीलांनी केली. त्या मुलाने परत येऊन झोपेत असलेल्या जन्मदात्याच्या डोक्यात फावड्याच्या तुंब्याने मारुन खून केल्याची घटना तालुक्यातील टाकरवण येथे उघडकीस आली. ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मुलगा परतला पण काळ बनून अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
मयत वडील मारुती लक्ष्मण भुंबे ( वय ५५ वर्ष ) रा. टाकरवण ( ता. माजलगाव ) यांनी आठ दिवसांपासून मुलगा बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे ( वय ३१ वर्ष ) हा गायब असल्याची तक्रार माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. अनेकजण मुलाचा शोध घेत होते परंतु तो सापडला नाही. गुरुवारी ( दि. २ ) अचानक पहाटे घरी परतला. परत येताच झोपेत असलेल्या जन्मदात्याच्या डोक्यात फावडा ( खोरा ) च्या तुंब्याने डोक्यावर घाव घातला. यावेळी आवाजाने इतर नातेवाईक आले व त्यांनी मुलगा बाळू यास पकडून बाजुला नेलं. जखमी वडील मारुती भुंबे यांना दवाखान्यात घेऊन जाताना पुन्हा परत येऊन मुलाने डोक्यात फावडा मारला यामुळे मारुती लक्ष्मण भुंबे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलीसांना देताच माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी बाळु उर्फ लक्ष्मण मारोती भुंबे यास ताब्यात घेतले. मुलाने जन्मदात्याचा खून का केला? यामागील कारण अद्याप गुलदस्त्यात असून पोलीस तपासात निष्पन्न होईल. या घटनेने माजलगाव तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.