आज्जीने नवी चप्पल घेऊन न दिल्याने १० वर्षाच्या नातवाने असं काही केलं की, जिल्हा सुन्न..
लोकगर्जनान्यूज
बीड : घरात अठरा विश्व दारिद्र्य ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. लेकराची परवड होऊ नये म्हणून माय-बापाने पोरगा आज्जी जवळ सोडून बिऱ्हाड पाठीवर घेऊन ऊस तोडायला कारखान्यावर गेले. नातवाने आज्जी कडे नवं चप्पल घेऊन देण्याचा हट्ट केला. परंतु चप्पल आर्थिक अडचणींमुळे आज्जीने चप्पल घेतली नाही. याचा राग आल्याने १० वर्षांच्या नातवाने कोणी विचारही करणार नाही असा निर्णय घेतला सर्वांना धक्का बसला असून बीड जिल्हा सुन्न झाला आहे.
बीड हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांसह राज्या बाहेरील साखर कारखान्यांवर येथील मजुर ऊसतोडीसाठी जातात. जिल्ह्यातील अनेक प्रश्नांचा या ऊसतोडीशी संबंध असल्याचे अनेकदा निष्कर्ष काढण्यात येते. जसे बालविवाह, गर्भाशय काढून टाकने तसेच गर्भपात याला हेच कारण असल्याचे सांगितले जाते. या ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून घेण्यात अनेकजण अभिमान बाळगत मोठं-मोठ्या वाहनात फिरतात. पण आज या ऊसतोड मजुरांची काय अवस्था आहे? ही दर्शवणारी घटना दिंद्रुड ( ता. माजलगाव ) पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी ( दि. १३ ) दुपारी उघडकीस आली. ज्यांचे नेते अलिशान गाड्यांनी फिरतात त्यांच्या मुलांना नवी चप्पल घेऊन देण्या इतपत परिस्थिती कुटुंबाची राहिली नाही? काही वर्तमानपत्रने दिलेल्या ऑनलाईन वृत्तानुसार युवराज श्रीमंत मोरे ( वय १० वर्ष ) रा. बोडखा कासारी, याने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेलेले आहेत. तो आजोळी आज्जी कडे हिंगणी ( खुप. ) ता. धारुर येथे रहातो. युवराजने आज्जी कडे नवं चप्पल घेऊन देण्याची मागणी केली. परंतु स्वतः च नाव युवराज अन् वडीलांच नाव श्रीमंत असलं तरी तो ऊसतोड मजुराचा मुलगा आहे हे त्याला समजत नव्हतं! पैसे नसल्याने आज्जीने चप्पल घेतलं नाही. याचा राग आल्याने तो आई-वडीलांकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडला व गावाच्या बाहेर काही अंतरावर तो साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याने चप्पल घेऊन न दिल्याच्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे वृत्त आहे. ही घटना समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. दिंद्रुड पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करून मृतदेहाचे धारुर येथे सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी आणले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर एका शुल्लक कारणावरून तेही अवघ्या १० वर्षांच्या मुलाने आपलं आयुष्य संपवलं या बातमीने जिल्हा सुन्न झाला.