अपमान करणाऱ्या नेत्यावर कार्यकर्त्याने केला धारदार शस्त्राने हल्ला? बीड जिल्ह्यातील घटना

लोकगर्जना न्यूज
भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने नेत्यावरच धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये नेता जखमी झाला असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत. सदरील घटना सोमवारी ( दि. ६ ) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. हल्लेखोर कार्यकर्त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार नेत्याने दिलेल्या अपमानास्पद वागणूकीचा राग आल्याच्या कारणातून घडल्याचे वृत्त आहे.
नितीन लोढा असे नेत्याचे नाव असून चौसाळा ( ता. बीड ) येथील लोढा हे मोठं राजकीय प्रस्थ असलेलं नाव आहे. नितीन लोढा भीशंकर शुगरचे चेअरमन आहेत. हल्ला करणारा रंजित गुंजाळ गावातीलच त्यांचाच कार्यकर्ता आहे. त्याने लोढा यांना सोमवारी रात्री फोन करुन भेटायचे असे सांगितले. भेटण्यासाठी ते घराबाहेर थांबले असताना रंजित दुचाकीवर आला. येताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने हल्ला चढवला . हल्ला करताच लोढा यांनी आरडाओरडा केली. आवाज ऐकून काहीजण मदतीला धावून आले. हल्लेखोर दुचाकी सोडून बायपास रोडने पळाला. पाठलाग करुन पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी चौसाळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्ल्यामध्ये तोंडावर मार लागल्याने नितीन लोढा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सदरील घटना ही दुर्लक्ष केल्याने व अपमानास्पद वागणूक दिल्याने कार्यकर्ता असलेल्या रंजित गुंजाळ यांने हल्ला केल्याची चर्चा आहे.