अपघातांचे सत्र सुरूच! आज धारुर तालुक्यात दोन अपघात; दोन ठार दोन जखमी

लोकगर्जना न्यूज
बीड जिल्ह्यातील अपघातांच्या घटना थांबण्याचे नाव घेते नसून, नियमित अपघाताच्या घटनांनी प्रवास म्हटले की, अंगावर काटा येतं आहे. आज मंगळवारी ( दि. १० ) धारुर तालुक्यात तेलगाव व भोगलवाडी येथे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही अपघातात एक-एक ठार तर एक-एक जखमी असे दोन ठार,दोन जखमी झाले आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबीतांडा येथून दोन सख्खे भाऊ आदित्य व अभिजित हे दुचाकीवर तेलगावला आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात आदित्य शंकर राठोड ( वय २० वर्ष ) हा ठार झाला. अभिजित शंकर राठोड ( वय २२ वर्ष ) हा जखमी झाला. सोनीमोहा ( ता. धारुर ) येथील महादेव साहेबराव तोंडे ( वय ३८ वर्ष ), रघुनाथ वैजनाथ तोंडे ( वय ४२ वर्ष ) हे दोघे भोगलवाडी येथे दुचाकीवर लग्नासाठी जात होते. दरम्यान भोगलवाडी पाटीवर एका अज्ञात भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. धडक बसताच दोघेही रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. धडक दिलेल्या कार चालकाने यांना मदत करण्याऐवजी कारसह पोबारा केला. दोघाही जखमींना प्रथम धारुर येथे दवाखान्यात दाखल केले. परंतु महादेव साहेबराव तोंडे यांच्या डोक्याला गंभीर जखम असल्याने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु रस्त्यातच मृत्यू झाला. या दोन्ही घटना मध्ये तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.