अनेकांना भक्कमपणे उभं करुन ‘ती’ उतार वयामुळे नामशेष होतेय
आडस जि. प. शाळा इमारत निसर्ग नियमानुसार काल बाह्य झाल्याने पाडली जाणार
लोकगर्जना न्यूज
केज तालुक्यातील आडस येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत सात दशकांपासून अनेक उन्हाळे, पावसाळे सोसत उभी आहे. या काळात तीनं आयुष्यात अनेकांना घडवून भक्कमपणे उभे केले. महाराष्ट्र राज्याला उच्च शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी, अनेक डॉक्टर, वकील,शिक्षक, प्राध्यापक, अभियंते सह आयुष्यातील प्रथम माणूस म्हणून जगण्याची पायाभरणी केली. पण ‘ती’ आता उतार वयामुळे कालबाह्य झाली. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करुन तीला पाडण्यात येत आहे. याचे टेंडरही झाले असून दोन दिवसांत या इमारतीला बुलडोझर लावण्यात येईल. अनेक पिढ्यांच्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
माणूस असो किंवा इमारत प्रत्येकाचं एक उभरता अन् उतरता काळ असतो. निसर्ग नियमानुसार एक दिवस या जगाचा, मातीचा, मित्र,परिवाराचा निरोप घ्यावा लागतो. परंतु आयुष्यात एखाद्याचं इतकं महत्त्व असतो की, ते विसरायचं ठरवल तरी विसरता येत नाही. मला वाटतं असं महत्व प्राथमिक शाळेचं असेल, कारण आई-वडील अन् घराचं अंगण सोडल्यानंतर पहिलं पाऊल पडत तो शाळेतच. हीच शाळा घराची माया देत मित्र देत जगाची वेगळीच ओळख करून देते. प्रत्येकाची माणूस म्हणून कसं जगायचं याचं अ,ब,क शिकवून त्याची पायाभरणी करते. या पायाभरणी वर प्रत्येक जण आपापल्या आयुष्याचं शिखर गाठतो. आज हे सर्व आठवयाच कारण म्हणजे, आडस ( ता. केज ) येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेची इमारत उतारवयामुळे कालबाह्य झाली आहे. अन् यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. यामुळे ही कालबाह्य इमारत पाडण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासाठी सविता आकुसकर यांनी आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेऊन इमारत पाडण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. इमारत पाडण्याचे टेंडरही सुटलं असून, येत्या दोन-चार दिवसात प्रत्यक्ष इमारत पाडण्याचे काम सुरू होईल. काही धोका होण्याअगोदर इमारत पाडण्यात येत असल्याचे समाधान आहेच. परंतु या शाळे संबंधी मागील ७ दशकांच्या अनेक पिढ्यांच्या मनात वेगवेगळ्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत. जवळपास सन १९६० पासून २०२२ पर्यंत अनेकांचा आयुष्यातील सुरवातीचा काळ या शाळेत गेला आहे. अन् या निरागस आठवणी विसरणे शक्य नाही. या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेले रामभाऊ किर्दक यांच्या रुपाने राज्याला उच्च शिक्षण संचालक तर व्यंकटराव नेटके यांच्या रूपाने शिक्षणाधिकारी, प्रसिद्ध साहित्यिक बालाजी सुतार यांच्यासह अनेक डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, पोलीस कर्मचारी व अधिकारी, व्यापारी, उत्तम शेतकरी असे अनेकांना उभं केलं. परंतु वय वाढल्याने शाळा वार्धक्याने थकली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली, लाथ मारली तर भिंत पडेल अशी अवस्था झाल्याने अनेक वर्षांपासून मागील बाजु वापरात नव्हती. त्यामुळे अधिकच दुरावस्था झाली. १७ खोल्या असलेली पत्र्याची पण चौकोनी, देखणी अशी ही टोलेजंग इमारत पाडण्यात येणार आहे म्हणताच. अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या असून, इमारत पडणार हे समजल्यानंतर मन खिन्न झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
चाफा व शेळवटचे झाड तग धरून
समोरील गेटने शाळेच्या आत गेलं की, मध्ये जाताच उजव्या बाजूला मोठं चाफ्याचं आणि शेलवटच झाड. बाजुलाच लिंबोणी तर एक मोठं तुतुचे ( सैतूस ) चे झाड त्यावर चमेलीची वेल. डाव्या बाजूला गुलमोहरचे झाड. असे मनमोहक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.