अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; बीड-गेवराई रस्त्यावरील घटना

लोकगर्जना न्यूज
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसल्याने बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना गेवराई-बीड रस्त्यावर आज शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत बिबट्याला पहाण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.यापुर्वीही गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन जवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला होता त्यानंतर या घटनेने तालुक्यात बिबट्यांचा वावर मोठा असल्याचे दिसून येत असल्याने खळबळ माजली आहे.
सुत्रांच्या माहिती नुसार आज शनिवार ( दि. १६ ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गेवराई-बीड रस्त्यावरील शारदा इंग्लिश स्कूल समोर एक बिबट्या रस्ता ओलांडताना त्यास अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. धडक बसताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जीव धोक्यात घालून जखमी बिबट्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत बिबट्या गतप्राण झाला. बिबट्या अपघातात ठार झाल्याची बातमी पसरताच पहाण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली. यामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर ते ही घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगवून वाहतूक सुरळीत केली. वन विभागाला घटनेची माहिती दिली.