लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यात आष्टी आणि बीड या दोन्ही मतदारसंघात महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला होता. यातील आष्टी मतदारसंघाचा तिढा सुटला असून सुरेश धस यांनी सर्वांवर मात केली असून त्यांना आष्टीतून भाजपा कडून अधिकृत उमेदवारी घोषित केली. तर दुसरा मतदारसंघ बीडचा पेच अद्यापही कायम असून, युती हा पेच कसा सोडविणार याची उत्सुकता लागली आहे.
यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये तीन-तीन प्रमुख पक्षांसह विविध मित्र पक्ष आहेत. यामुळे जागा वाटपाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजला. उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस हाती असतानाही उमेदवारांची काही ठिकाणी घोषणा झाली नाही. बीड जिल्ह्याचा विचार केला तर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. पण महायुतीचे बीड आणि आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच दिसून आली. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे आहेत. यामुळे या जागेवर अजित पवार गटाचा अधिकार होता. परंतु येथे सुरेश धस यांच्यासाठी भाजपा अडून बसला होता. दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. यामुळे येथे निर्णय होत नव्हता, परंतु अखेर आज भाजपाने जाहीर केलेल्या २५ उमेवारांच्या यादीत सुरेश धस यांना आष्टीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे धस उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. पण आता आमदार बाळासाहेब आजबे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असतना बीड विधानसभा मतदारसंघाचा पेच अद्यापही सुटलेला नाही. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटला सुटल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप अधिकृत घोषणा न झाल्याने येथील उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.