अंबाजोगाई विभागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू

लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : विद्युत देयकाची थकीत बाकी वसूल न केल्याच्या कारणावरून कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अन्यायाविरुद्ध विद्युत तांत्रिक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत सोमवार ( दि. १० ) पासून अंबाजोगाई विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
महावितरणची ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात बाकी आहे. ती वसुल करण्यासाठी महावितरण कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु विद्युत देयक वसुलीची १४६४ च्या परिपत्रकानुसार शाखा अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांची आहे. त्यात रक्कम किती आहे त्यानुसार जबाबदारी कोणाची हे स्पष्ट आहे. परंतु वसुलीसाठी सर्रास विद्युत तांत्रिक कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. वसुली झाली नाही तर या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. या अन्यायाविरुद्ध वीज कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार ( दि. १० ) सकाळ पासून अंबाजोगाई विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात अंबाजोगाई विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आंदोलनात भरडला जातोय ग्राहक
विद्युत तांत्रिक कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून, यामध्ये जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी झाले आहेत. यामुळे फ्यूज गेला अथवा काही तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळ पासून बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरळीत झाला नाही. सकाळ पासून वीजपुरवठा बंद असल्याने त्रास सहन करावा लागतो आहे. अधिकारी, कर्मचारी असा हा अंतर्गत वाद आहे. परंतु अनेक ठिकाणी सकाळ पासून वीजपुरवठा बंद असल्याने या वादात ग्राहक भरडला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ग्राहक पैसे देऊन वीज खरेदी करतो. त्यामुळे महावितरण कंपनीने ग्राहकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी अशी मागणी केली करण्यात येत आहे.