अंबाजोगाई येथे ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरचा अपघात:एक ठार दहा जण जखमी
लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : तालुक्यातील येल्डा येथून ऊसतोड मजुर घेऊन कारखान्याकडे चाललेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन घडलेल्या अपघातात एक ११ वर्षीय मुलगा जागीच ठार तर दहा जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुकुंदराज घाटात घडली आहे. दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावर्षी साखर कारखाने लवकरच सुरू होणार असल्याने बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुर आपलं बिऱ्हाड घेऊन कारखान्याकडे चालले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथील ऊसतोड मजुरांची टोळी घेऊन ट्रॅक्टर कारखान्याकडे चाललं होतं. दरम्यान ट्रॅक्टर अंबाजोगाई जवळ मुकुंदराज घाटात आल्यानंतर ट्रॅक्टरचा रॉड तुटला व ट्रॉली पलटी झाली. यामध्ये गंभीर मार लागल्याने रणजित अमोल कांबळे ( वय ११ वर्ष ) हा जागीच ठार झाला. यावेळी मॉर्निंग वॉकला आलेले नायब तहसिलदार मिलिंद गायकवाड, लिपिक शेख अन्वर, सचिन अंजान, सारंग पुजारी, नाना गायकवाड यांनी जखमींना मदत करुन तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी दवाखान्यात धाव घेतली असून ते तळ ठोकून आहेत. जखमींना आधार देत आहेत. दहा जण जखमी असून यातील दोघे गंभीर जखमी आहेत.