अंबाजोगाई-भरवस्तीत डोक्याला बंदुक लावून 39 लाखांची रोकड पळवली
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : पतसंस्थेतील रोख रक्कम रात्री सुरक्षित ठिकाणी ( लॉकर ) ठेवण्यासाठी घेऊन जाताना कॅशिअरला रस्त्यात अडवून डोक्याला बंदुक लावून 39 लाखांची रोकड पळवल्याची घटना शहरात शुक्रवारी ( दि. 17 ) रात्री ९ च्या सुमारास घडली. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेतील काम संपवून रात्री 9 च्या सुमारास कॅशिअर गणेश देशमुख दिवसभरातील रक्कम 39 लाख रुपये एका पिशवीत घेऊन ते लॉकर मध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी शिपाईला सोबत घेऊन दुचाकीवरुन चालले होते. दरम्यान मुकुंदराज कॉलनीत आले असता पाळतीवर असलेल्या तिघांनी दुचाकी अडवून देशमुख यांच्या डोक्याला बंदुक लावली तर एकाने धारदार चाकू काढला या शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेली रोकडची पिशवी घेऊन चोरट्यांनी धुम ठोकली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. भरवस्तीत 9 च्या सुमारास घटना घडल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांना पोलीसांची भीतीच राहिली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.