अंबाजोगाई-दुचाकीच्या भीषण अपघातात दोन ठार,एक गंभीर
अंबाजोगाई-तांदुळजा रस्त्यावर सातेफफळ फाट्याजवळील घटना
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : अंबाजोगाई-तांदुळजा रस्त्यावरील सातेफळ फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात दोन ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ( दि. २७ ) रात्री घडली आहे. यातील एका मयताचे तर अवघ्या दहा महिन्यापुर्वीच लग्न झालेले असून अंगाची हळद व्यवस्थित निघाली तीच काळाने गाठल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशांत सुनील ठाकूर ( वय २३ वर्ष ) रा. पाटोदा म. ( ता. अंबाजोगाई ) , बालाजी भुजबळ ( वय ३० वर्ष ) रा. जोडजवळा ( ता. जि. लातूर ) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, शिवहार भुजबळ हे गंभीर जखमी आहेत. सुशांत हा एकटाच आपल्या दुचाकीवरून पाटोदा म. येथून अंबाजोगाईच्या दिशेने जात होता. तर बालाजी भुजबळ आणि शिवहार हे दोघे दुचाकीवरून त्यांच्या गावी जोडजवळा येथे जात होते. दरम्यान अंबाजोगाई-तांदुळजा रस्त्यावरील सातेफळ फाटा येथे आले असता या दोघांच्या दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यावेळी मार लागल्याने तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. धडक होताच मोठा आवाज आल्याने आजुबाजुची लोक धावून आले. जखमींना मदत करुन तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तपासणी करुन वरील दोघांच्या मृत्यूची घोषणा केली. जखमींवर उपचार सुरू आहेत. यातील सुशांत ठाकूर यांचे अवघ्या १० महिन्यापुर्वीच लग्न झालेले असून, या अपघाताने त्यांचा संसार मोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.