अंबाजोगाई तालुक्यात अवकाळीचा तडाखा; कामान कोसळून कारचा चुराडा
लोकगर्जनान्यूज
अंबाजोगाई : शहरासह दुपारच्या सुमारास तालुक्यातील काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. पुस येथे कमान कोसळून कारचा अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने जिवितहानी टळली आहे.
पुस ( ता. अंबाजोगाई ) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पद्मावती देवी मंदिराची सिमेंट काँक्रीटची कमान वादळी वाऱ्यांमुळे जमीनदोस्त झाली. यावेळी एक कार जवळच उभी होती. त्यावरच कमान पडल्याने कारचा चुराडा झाला. तसेच अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे पडल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाला वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या तारा तुटल्याने दवाखान्याचा वीजपुरवठा खंडित झाला. नंदकिशोर मुंदडा यांनी दखल घेत यंत्रणा कामाला लावून झाडे हटवून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला. दवाखान्याचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तारांची जोडणीचे काम सुरू केले आहे. यापुर्वीही अंबाजोगाई तालुक्याला अवकाळीचा तडाखा बसला आहे. काल केज येथे अवकाळीने धुमाकूळ घातल्यानंतर आज अंबाजोगाई आणि परळीत कहर केल्याचे दिसून आले. परळी येथेही वादळीवाऱ्याने झाडे तुटून पडली असल्याचे वृत्त आहे.