अंबाजोगाई कारखाना कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी आंदोलन; पालकमंत्री मुंडे अन् चेअरमन आडसकरांना घरचा आहेर!
लोकगर्जनान्यूज
बीड : अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे संचालक मंडळ आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या वेंकटेश्वरा कंपनी या दोघांनीही कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निधी आदी देणी थकवली आहेत. परिस्थिती असतानाही कारखाना बंद ठेवला असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. याबाबत वेळोवेळी तोंडी व लेखी मागणी करुनही कर्मचाऱ्यांचा देणी न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी मंगळवार ( दि. २६ ) बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन सुरू केले. यामुळे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि चेअरमन रमेश आडसकर यांच्यासाठी हा घरचा आहेर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील सर्वात जुना अन् तीन जिल्ह्याचा कार्यक्षेत्र असलेला अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना आहे. परंतु मागील काही वर्षांपासून हा कारखाना डबघाईस आला. मागे काही वर्ष तर हा पुर्णपणे बंद होता. परंतु रमेश आडसकर यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी कारखाना सुरू केला. काही हंगाम व्यवस्थित चालविला. परंतु २०२१ मध्ये त्यांनी हा कारखाना व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा.लि. अंबासाखर यांना चालविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिला. पण या कंपनी ऐवजी बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीच चालवायला घेतला असे म्हटले जाते.या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे भाडेतत्त्वावर देण्याआधी २०१२ ते १७ या काळातील ६३ महिन्यांचा ले ऑफ पगार व भविष्य निधी, सन २०१८ ते जून २०२१ काळातील चार महिन्यांचा पगार, भविष्य निधी, सन २०१९ ते २०२० या काळातील २२ महिन्यांचा ले ऑफ पगार व भविष्य निधी कर्मचाऱ्यांचा येणं आहे. यानंतर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रा.लि. अंबासाखर यांनी भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर चालू महिन्यातील ४ महिन्यांचे वेतन थकित आहे. तसेच सन २०२१-२२ मधील सात महिन्यांचे ओव्हर टाईम थकित असून जुलै २०२१ पासून आजतागायत भविष्य निधी भरणा केला नाही. असे कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांची वरील देणी कारखान्याच्या दोन्ही प्रशासनाने थकवली आहेत. यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून मागणी केली. याबाबत मा. भविष्य निधी आयुक्त यांच्याकडे न्याय मागण्यात आला. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे जमा करण्यात आलेली आहेत. यानंतर काहीच कारवाई नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून मंगळवार ( दि. २६ ) पासून जिल्हाधिकारी कार्यालय,बीड समोर धरणे आंदोलन सुरू केले. यामध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.