
अंबाजोगाई : येथील एका मंगल कार्यालयात आयोजित हळदी समारंभात नाचताना हवेत गोळीबार केल्याची घटना ( दि. २६ ) रात्री घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटना उघडकीस आली. याची गंभीर दखल घेत सरकारच्या वतीने पोलीस नाईक यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन नवरदेवासह मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे वरात पोलीस ठाण्यात जाणार! असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच शांत शहर म्हणून ओळख असलेल्या अंबाजोगाईत या घटनेने खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई जवळील केज रोडवर असलेल्या सायली लॉन्स येथे शनिवारी ( दि. २६ मार्च ) बालाजी भास्कर चाटे रा. साकुड ता. अंबाजोगाई याचा हळदी समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी नवरदेव बालाजी हा आपल्या मित्रांसह नाचून आनंद साजरा करताना अतिउत्साहत बेकायदेशीर रित्या जवळ बाळगलेल्या पिस्टल अथवा रिव्हालवर मधून हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही घटना उघडकीस आली. याची पोलीस प्रशासनाचे गंभीर दखल घेत सायली लॉन्स येथील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले असता त्यामध्ये बालाजी भास्कर चाटे रा. साकुड, शेख बाबा रा. क्रांती नगर ( अंबाजोगाई ) व इतर दोन ते तीन जण दिसत असून, ११ वाजण्याच्या सुमारास रिव्हालवर सारख्या दिसणाऱ्या शस्त्रातून हवेत गोळीबार केल्याचे दिसून येत आहे. सदरील फुटेज पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद अंगद यलमटे अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून बालाजी भास्कर चाटे, शेख बाबा सह इतर दोन ते तीन अनोळखी इस्मांवर इतरांच्या जीविताला धोका होईल असे कृत्य केले म्हणून तसेच भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने मात्र अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे.