अंधाराचा सहावा दिवस; महावितरण कंपनी फक्त कर्मचारी, गुत्तेदार पोसण्यासाठी आहे का?

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील वयराट डीपीचे सिंगल फेजचे तीनही रोहीत्र जळाल्याने शेकडो ग्राहक अंधारात आहेत. पाच दिवसांनंतर दोन रोहित्र मिळाले असून एक रोहित्राची प्रतिक्षा आहे. तब्बल सहा दिवस रोहित्रा अभावी ग्राहकांना अंधारात राहावं लागत असेल तर महावितरण कंपनी फक्त कर्मचारी, अधिकारी अन् गुत्तेदार पोसण्यासाठी आहे का? असा संतप्त प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
केज तालुक्यातील आडस हे सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गाव असून येथील ग्राहक नियमित वीजबिल भरणा करतात. ( महावितरणच्या चुकीमुळेच कोणाचे वीजबिल जास्त आले असेल ते थकबाकीत असतील ) गाव मोठं असल्याने येथे गावठाण फिडर वेगळं आसने आवश्यक आहे. तसेच येथे गावात पुर्ण सिंगल फेज रोहित्र आहेत. एका डिपीवर तीन रोहित्र असतात. तेही प्रत्येकी २५ के.व्ही. क्षमतेचे, यामुळे ग्राहक जास्त अन् डीपीची क्षमता कमी असे झाल्याने येथील रोहित्र नेहमीच जळतात. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी याचे खापर वीज ग्राहकांवर फोडून मोकळे होतात. मागील सहा दिवसांपुर्वी येथील वयराट डिपीचे सिंगल फेजचे तीनही रोहीत्र जळाले आहेत. तेंव्हा पासून या डीपी वरील शेकडो ग्राहक अंधारात आहेत. सहा दिवसांपासून महावितरण येथे रोहित्र उपलब्ध करून देऊ शकली नाही. बुधवारी ( दि. ११ ) पाचव्या दिवशी केवळ दोन सिंगल फेज रोहित्र मिळाले असून जळालेले तीन आहेत. तिसरा रोहित्र गुरुवारी सायंकाळ पर्यंत उपलब्ध झाला नाही. त्यामुळे या दो रोहित्रांवर तीन फेजचा भार टाकला तर तेही पुन्हा जळण्याची शक्यता आहे. सहा-सहा दिवस शेकडो ग्राहक अंधारात रहातात अन् महावितरण कंपनीला रोहित्र उपलब्ध करून देता येत नाहीत. या मागे नेमकं कारण काय? वीज ग्राहक फक्त वसूली साठी अन् ते आलेले पैसे गुत्तेदार, अधिकारी, कर्मचारी पोसण्यासाठीच आहे का? जर असे नसेल तर सहा दिवसांत आडस येथील रोहित्र उपलब्ध का झाले नाही? ग्राहकांच्या सेवेसाठी महावितरण कंपनी असती तर नक्कीच रोहित्र उपलब्ध झाले असते अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
साहेब भाजीसाठी आणलेलं तेल दिव्यालाच चाललंय
साहेब आम्ही गरीब माणसं आहोत. रॉकेल बंद असल्याने भाजीसाठी आणलेलं गोड तेल दिव्याला वापरुन बीना तेलाची भाजी खातोय, अंधारामुळे घुशी, उंदीर अंगावर उड्या मारत असून सहा दिवसांपासून झोप येत नाही. लाईट नेमकी येणार कधी? महिना होत नाही तर बिल येतंय नाही भरलं तर लाइट तोडता अन् ही सहा दिवस अंधार कोणत्या नियमात बसतय असा प्रश्न आडस येथील सुखदेव वाघमारे या मजुराने कनिष्ठ अभियंता रवी शिंदे यांना विचारला आहे. त्यांनी याचे उत्तर तर दिले नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असतील तर त्यांनी उत्तर द्यावे.