अंग खाजवणारी पावडर टाकून वृद्धाचे २ लाख लंपास
परळी : चक्क बँकेतून एका वृध्दाचे २ लाख १० हजार रुपये भामट्यांनी लंपास केल्याची घटना परळी येथे सोमवारी ( दि. ३ ) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वैद्यनाथ बँकेत घडली आहे. याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी प्रभाकर बालाजी शिंदे हे वृध्द सेवानिवृत्त कर्मचारी वैद्यनाथ बँकेत आले. व्यवहार पूर्ण करून थांबले होते. यावेळी अज्ञात तीन भामट्यांनी संगनमत करून शिंदे यांच्या अंगावर पावडर टाकली . त्यामुळे शिंदे यांचे अंग खाजवू लागले म्हणून त्यांनी रोख रक्कम असलेली हातातील पिशवी खुर्चीवर ठेवली . पिशवी कडे त्यांचं लक्ष नसल्याचा फायदा उचलत पिशवीतून २ लाख १० हजार रुपये रोख, पासबुक , चेकबुक आदी लंपास केले. पिशवी कडे लक्ष गेल्यानंतर रक्कम चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर प्रभाकर बालाजी शिंदे यांनी थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.त्यावरुन शहर पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांच्या विरोध गुरनं ६/२०२२ कलम ३७ ९ , ३४ भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि भार्गव सपकाळ करत आहेत .