धक्कादायक! बीडमध्ये आरोपीने घडवला पोलीस व्हॅनचा अपघात; पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी

लोकगर्जनान्यूज
बीड : तालुक्यातील मुळुकवाडी येथील चुलत्याच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या आरोपीला स्थळ पंचनाम्यासाठी घेऊन जाताना आरोपीने चालत्या पोलीस व्हॅनचे स्टेरींग ओढल्याने व्हॅन रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोपी व पंच असे सहाजण जखमी झाल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दवाखान्यात धाव घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी शेतीच्या वादातून रोहिदास निर्मळ याने चुलता-चुलती व इतर दोघे असे चार जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. यातील गंभीर जखमी चुलत्याचा मृत्यू झाले आहे तर चुलतीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहिदास यास खूनाच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. आज सोमवारी त्यास मुळुकवाडी येथे स्थळ पंचनाम्यासाठी पोलीस व्हॅनमध्ये घेऊन जात होते. दरम्यान मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर ससेवाडी फाटा येथे पोलीस व्हॅन पोचली असता आरोपीने अचानक चालत्या व्हॅनचे स्टेरींग ओढल्याने चालकाचे नियंत्रण सुटून व्हॅन रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातात एपीआय शेख मुस्तफा, पोलीस कर्मचारी, एक पंच व आरोपी असे सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील जखमी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दवाखान्यात धाव घेतली आहे. आरोपीने केलेल्या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.