हॉटेल चालकाने उधारीसाठी ‘आमदाराचा’ ताफा आडवला!

लोकगर्जना न्यूज
२०१४ च्या निवडणूकीत पार्टी करुन अद्याप हॉटेलची उधारी न दिल्याने आणि फोनही घेत नसल्याने वैतागून गेलेल्या हॉटेल चालकाने पंचायतराज समिती पथकात आलेल्या आमदाराचा ताफा आडवल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे घडली आहे. सदरील आमदार सदाभाऊ खोत असून त्यांनी मी या हॉटेल चालकाला ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच हा बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे वृत्त आहे. यातील तथ्य त्यांनाच माहीत परंतु या घटनेची राज्यभर चर्चा सुरू आहे.
या बाबतीत विविध दैनिकांनी ई पेपरला वृत्त प्रसिद्ध केले. त्यानुसार आमदार सदाभाऊ खोत यांनी २०१४ मध्ये माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हा मांजरी ( ता. सांगोला जि. सोलापूर ) येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी पार्टी केली. तेव्हांची ही उधारी असल्याचे वृत्त आहे. अद्याप पर्यंत उधारी न दिल्याने हॉटेल चालकाने आक्रमक पवित्रा घेत चक्क सांगोला पंचायत समितीच्या आवारातच सदाभाऊ खोत यांची गाडी अडवली. ते खाली उतरताच उधारी मागण्यास सुरवात केली. सदाभाऊ खोत हे पंचायतराज समिती पथकात आलेले होते. एका ग्रामपंचायतीची पाहाणी करून ते सांगोला पंचायत समितीत आले होते. तेव्हा हा प्रकार घडला आहे. यावेळी त्यांच्यासोबत इतरही आमदार होते. हा हॉटेल चालक पुर्वीचा शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतीत खोत यांनी मी हॉटेल चालकास ओळखत नाही. माझ्याकडे कोणाचीही उधारी नाही असे म्हणत या घटनेचा खापर त्यांनी विरोधकांवर फोडलं आहे.