शेळीच्या पिल्लांचा वन्य प्राण्याने पाडला फडशा; धारुर तालुक्यातील घटना

धारुर : तालुक्यातील अंजनडोह येथे शेतातील शेळ्यांच्या कळपावर हल्ला करत वन्य प्राण्याने सहा पिल्लांचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे जवळपास ४० हजाराचे नुकसान झाले.
गणेश रामराव शिंपले हे आपल्या कुटुंबासह रुईधारुर रस्त्यावरील शेतात रहातात. रविवारी ( दि. १७ ) ते नेहमी प्रमाणे शेळ्या गोठ्यात कोंडून झोपी गेले. परंतु रात्री वन्य प्राण्याने शेळ्यावर हल्ला करुन तब्बल ६ पिल्ल्यांचा फडशा पाडला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सोमवारी घटना उघडकीस आली. शेतकऱ्याचे जवळपास ४० हजारांचे आर्थिक नुकसान झाल्याचे माहिती दिली. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. हा वन्य प्राणी नेमकं लांडगा होता की, दुसरा कोणता याबाबत संशय असून गेवराई जवळ नुकताच वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला असून या भागातही बिबट्याचा तर वावर नाही ना? असा संशय व्यक्त केला जात आहे.