हु…श्श…! अंधारातून सुटका तीनही रोहित्र बसले

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथील सिंगल फेजचे तिन्ही रोहित्र बसल्याने शुक्रवारी ( दि. १३ ) आडसच्या त्या भागाची अंधारातून सुटका झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
येथील वयराट डीपीचे सिंगल फेजचे तीनही रोहित्र जळाल्याने या डिपीवर असलेल्या भागात मागील सहा दिवसांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता तर अनेक वृत्त लावल्यानंतर तसेच भाजपा नेते रमेश आडसकर यांनी पाठपुरावा केल्याने बुधवारी ( दि. ११ ) रात्री उशिरा दोन रोहित्र उपलब्ध झाले. ते गुरुवारी बसवून तीन्ही फेजचा भार या दोन रोहित्रांवर टाकण्यात आला. यामुळे सकाळ पर्यंत हे ही जळतात की, काय? अशी धाकधूक होती. परंतु नशीब तसं काही घडलं नाही. तिसरंही रोहित्र शुक्रवारी ( दि. १३ ) उपलब्ध झाले. हे तिन्ही रोहित्र बसवून शुक्रवारी रात्री उशिरा तिन्ही रोहित्र सुरू झाले.मागील सहा दिवसांच्या अंधारातून सुटका झाली असल्याने वीज ग्राहकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
* गावठाण फिडर करावं – शिवरुद्र आकुसकर
आडस हे गाव मोठं असून बाजार पेठही मोठी आहे. यामुळे येथील सिंगल फेज रोहित्रांची क्षमता कमी पडत आहे. येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी गावठाण फिडर करुन गावातील सिंगल फेज ऐवजी मोठे रोहित्र बसवून थ्री फेज वीजपुरवठा करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवरुद्र आकुसकर यांनी केली.
* अजूनही काही रोहित्र जळालेलेच
वयराट डीपीचे तीनही रोहित्र मिळाल्याने हा प्रश्न सुटला आहे. परंतु अद्यापही दवाखाना डीपी १, हनुमान मंदिर डीपी २, डुमने डीपी १ असे चार रोहित्र जळालेले आहेत. त्यामुळे हेही रोहित्र महावितरण कंपनीने तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.