ही दोस्ती तुटायची नाही…! अपघातातील तीन्ही मित्रांवर अंत्यसंस्कार

घाटनांदुर : येथील अपघातातील तिघांवरही शोकाकुल वातावरणात येथील स्मशानभूमीत (दि. ५ ) दुपारी १२ वाजता अत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी गावातील सर्व लहान मोठे नागरिक मोठ्या संख्येनेउपस्थित होते. आज प्रथमच गावाकऱ्यांनी बंद पाळून श्रध्दांजली अर्पण केली. हे तिघेही एकाच गल्लीतील व मित्र असून एकाच दिवशी तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याने शेवटी ‘ही दोस्ती तुटायची नाही’ असा संदेश दिल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे सोमवारी ( दि. ४ ) रात्री १० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीषण अपघात घडला. यामध्ये लहु बबन काटूळे, रमेश विठ्ठल फुलारी, सौरभ सतीश गिरी हे तिघे ठार झाले. एकाच दिवशी एकाच गल्लीतील तिघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. प्रत्येक जण या घटनेने हळहळ व्यक्त करीत आहे. तसेच व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याने आज सर्व व्यवहार ठप्प होते. तिन्ही पार्थिवावर मंगळवारी ( दि. ५ ) दुपारी १२ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेवटचा निरोप देण्यासाठी पुर्ण गाव व लहान थोरांनी स्मशानभूमीत गर्दी केली होती.