स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करुन द्यावी लाडेवडगावच्या ग्रामस्थांची मागणी

केज : तालुक्यातील लाडेवडगाव येथे बौध्द , मातंग व वंजारी समाजासाठी स्वतंत्र व कायम स्वरूपी स्मशानभूमिसाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
लाडेवडगाव ता.केज जि.बीड येथे बौध्द , मातंग व वंजारी समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमि नसल्यामुळे या भागातील बौध्द , मातंग व वंजारी समाजातील व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यास या समाजातील समाज बांधवांना अत्यंत अडचणीचा सामान करावा लागत आहे . मिळेल त्या ठिकाणी अंतिम संस्कार करावे लागत असून लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे . हक्काची जागा नसल्याने वेळप्रसंगी समाजात वाद विवाद होतात. शांतता व सुव्यवस्थेचा देखील प्रश्न उपस्थित होतो . त्यामुळे या समाजातील लोकांची स्वतंत्ररित्या स्मशानभूमिसाठी जागा उपलब्ध करून देऊन महत्त्वाची समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे . जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालून स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी २७ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर राहुल शिंदे, बालासाहेब शेप यांच्यासह आदि ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.