पंधरा दिवसांनंतर सोयाबीन दरात काय झालंय बदल?

लोकगर्जना न्यूज
खाद्य तेलाचे दर वाढत असताना सोयाबीन दराची मात्र घसरण सुरू असून, मागील पंधरा दिवसांपासून दररोज दर कमी होत आहेत. या घसरत्या दरांमुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप सोयाबीन साठवून ठेवले आहे त्यांचं भ्रमनिरास झाला. परंतु पंधरा दिवसांनंतर किंचित दरवाढ झाल्यामुळे अपेक्षा वाढली असून ही दरवाढ नेमकी किती दिवस सुरू राहणार याकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
मागील वर्षी सोयाबीनला ऐतिहासिक असा प्रतिक्विंटल ११ हजार रुपये दर मिळाला. परंतु याचा बोटावर मोजता येतील इतक्याच शेतकऱ्यांना लाभ झाला. यावर्षी असाच दर मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. मात्र पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडताच दर घसरण्यास सुरू झाले. ११ हजारावरील दर ८ ते ९ हजारांवर आले. यातही कमी होत पुर्ण हंगामाचा अंदाज लावला तर सोयाबीन प्रतिक्विंटल ७ हजार ३०० ते ७ हजार ४०० असाच सरासरी राहिला. मागील पंधरा दिवसांपासून पुन्हा घसरण सुरू होऊन दररोज २०,३०,५० असे कमी होत, बुधवारी ( दि. ४ ) दर ६९०० वर आले. त्यामुळे दरवाढ होईल या आशेने मोठ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करता साठवून ठेवले त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला. काल लातूर एडीएम ( टिना ) मिलचा दर ६ हजार ९०० तर किर्तीचा दर ७ हजार ५० होता. यात आज गुरुवारी ( दि. ५ ) किंचित सुधारणा झाली असून एडीएम ६ हजार ९७० तसेच किर्ती ७ हजार २०० असा दर आहे. ही वाढ तब्बल पंधरा दिवसांनी झाली. त्यामुळे आता दर वाढणार की, आणखी घटणार याबाबत अद्याप खात्री नाही. तसेच दर वाढले तरी ७ हजार ४०० पर्यंत रहातील असा काही व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. परंतु वाढणार की, नाही. याबाबत सध्यातरी कोणीही खात्रीलायक माहिती देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून बाजार भावाकडे लक्ष ठेवून निर्णय घ्यावा असा सल्ला देण्यात येत आहे.
खाद्य तेलाची वाढ तर सोयाबीनची घसरण
सध्या पामतेलाची आयात बंद आहे. सुर्यफुल तेलाचाही तुटवडा असल्याने खाद्य तेलाचे दर वाढत आहे. परंतु तेल बियात मोडणारे सोयाबीनचे दर घसरत आहेत. यामागे काय? कारण असेल असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.