वारे डेरींग! भूक व तहानेने व्याकूळ बिबट्याला जीवदान
बेशुद्ध अवस्थेत घरी आणून पाणी व अन्न देताच झाला तरतरीत; वन विभागाने सोडलं जंगलात

लोकगर्जनान्यूज
बीड : शहरातील एक कुटुंब अहमदनगर येथून बीडकडे येताना अंमळनेर ( ता. पाटोदा ) जवळ बिबट्याचा एक बछडा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तो आजारी असेल म्हणून या कुटुंबाने त्यास सोबत आणले. रात्र असल्याने व खूप उशीर झाल्याने त्या बछड्याला पाणी पाजताच शुध्दीवर आला. अन्न खाण्यास देताच तरतरीत झाला. सकाळी वन विभाला माहिती दिली. त्यांनी बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेऊन सुश्रुषा करुन त्यास परत अंमळनेर येथे जंगलात सोडून दिले. या जागरुकते बद्दल त्या कुटुंबाचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच बिबट्याचा बछडा चक्क घरी घेऊन आल्याने वारे डेरींग अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
बीड शहरातील बालेपीर भागातील एक कुटुंब रात्री उशिरा अहमदनगर येथून बीडकडे येत होते. त्यांच्या वाहनात अंमळनेर ( ता. पाटोदा ) जवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. यामुळे वाहन थांबले होते. यावेळी वाहनाच्या लाईट मुळे त्यांना प्राणी रस्त्यावर पडलेला दिसला. वाहन त्यावरून जातील म्हणून त्यास बाजूला करण्यासाठी गेले असता त्याचे पोट उडत होते. तो बिबट्याचा बछडा असल्याचे लक्षात आले. त्याचे प्राण वाचावेत म्हणून त्यास घटनास्थळी बाटलीने पाणी पाजलं तो यामुळे शुध्दीवर आला. तो आजारी असेल म्हणून उपचार करावेत म्हणून त्यांनी तो बछडा सोबत घेऊन आले. घरी येईपर्यंत खूप रात्र झाली होती. जनावरांचा दवाखाना बंद असेल म्हणून त्यांनी रात्री बछड्याला घरीच अन्न व पाणी दिले. पोटात अन्न व पाणी जाताच तो तरतरीत झाला. यामुळे त्यास तहान व भूक लागल्यामुळे व्याकुळ ( बेशुद्ध ) झाला असेल असे लक्षात आले. या कुटुंबाच्या प्रसंगावधानामुळे एका वन्य प्राण्याला जीवदान मिळाले. सकाळी याची माहिती वन विभागाला देण्यात आली. त्यांनी बालेपीर भागातील घरी येऊन त्या बछड्याला ताब्यात घेतले.
ग्लुकोज देताच टुनटुन उड्या मारु लागला
वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधितांच्या घरी येऊन बिबट्याचा बछडा ताब्यात घेतला. त्यास पाहून तो अन्न , पाण्याविना अशक्त झाल्याचे लक्षात आले. त्यास तेथेच ग्लुकोज देण्यात आले. ग्लुकोज पोटात जाऊन काही वेळ झाला की, तो बछडा पिंजऱ्यात टुनटुन उड्या मारु लागला.
पुन्हा त्याच जंगलात परत सोडलं
परत त्या बछड्याला आपलं कुटुंब मिळावं यासाठी जेथे हा बछडा मिळून आला त्याच ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोडून दिले.
या घटनेने वन विभागाचा कारभार चव्हाट्यावर!
जिल्ह्यातील जंगलात हरिण, कोल्हे, ससे, मोर , बिबटे असे अनेक वन्य पशु ,पक्षी आहेत. त्यांना उन्हाळ्यात पाणी, अन्न मिळावे म्हणून पाणवठे तयार करून त्यात नियमित पाणी ठेवणं आवश्यक आहे. जेणे करून हे वन्यजीव गावाच्या दिशेने येऊ नये अन् यामुळे वन्य जीव अथवा मानवांना नुकसान होऊ नये. परंतु वन विभाग याकडे दुर्लक्ष करतोय का? पाणी न मिळाल्याने तो बछडा बेशुद्ध झाला होता. तो पाण्याच्या शोधात रस्त्यावर पडलेला आढळला. असे प्रश्न उपस्थित करत वन विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.