Beed-गावठी कट्टा ( पिस्तूल ) दोन काडतूस जप्त; परळी शहरात खळबळ

लोकगर्जनान्युज
ऐन निवडणुकीच्या काळात परळी शहरातून पोलीसांनी एकास ताब्यात घेऊन त्याकडून एक गावठी कट्टा ( पिस्तूल ) आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली. या घटनेने परळी शहरात खळबळ उडाली आहे. सदरील कारवाई संभाजीनगर पोलीसांनी केली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संभाजीनगर परळी पोलीसांना गुप्त खबऱ्या कडून माहिती मिळाली की, शहरातील उड्डाणपुलाखाली एक व्यक्ती उभा असून, त्याकडे पिस्तूल आहे. माहिती मिळताच दोन पंचांना सोबत घेऊन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना शहरातीलच फुलेनगर भागातील जुन्नी सुरजसिंग प्रेमसिंग हा मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याकडे गावठी बनावटीचा स्टीलचा गावठी कट्टा ( पिस्तूल ) ज्याची किंमत ४० हजार, दोन जिवंत काडतूस प्रत्येकी १ हजार असा एकूण ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जुन्नी सुरजसिंग प्रेमसिंग याच्यावर संभाजीनगर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून या काळात पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस असे घातक शस्त्र जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाई बदल संभाजीनगर पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.