सोयाबीन दरात चढउतार; दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचं भ्रमनिरास

लोकगर्जना न्यूज
बीड : दर वाढ होईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. परंतु दर वाढत नसून ते कमीच होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं भ्रमनिरास झाला आहे. दोन दिवस दरवाढ झाली की, पुन्हा पंधरा दिवस घसरण होत असल्याने खरीपाची पेरणी झाली तरी दर स्थिर रहात नसल्याने सोयाबीन विकावे की, ठेवावे या संभ्रमात सोयाबीन उत्पादक शेतकरी दिसत आहे.
गतवर्षी सोयाबीनला कोणी विचारही केला नसेल अशी ऐतिहासिक दरवाढ होऊन ११ ते १२ हजार रु. प्रतिक्विंटल अशी वाढ झाली. ही दरवाढ शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर झाली. यापुर्वीच शेतकऱ्यांनी ३ हजार ५०० ते ४ हजार प्रतिक्विंटल या दराने सोयाबीन विकून मोकळे झाले. यंदाही असे होऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहेत. परंतु जे लहान व अडचणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढताच ७ ते ७ हजार ५०० रु. विकून टाकले. तेच फायद्यात असल्याचे चित्र सध्याच्या दर पहाता वाटत आहे. लातूर येथील ज्या एडीएम मिलवरुन स्थानिक पातळीवर आजूबाजूच्या जिल्ह्यात सोयाबीन दर ठरतात तेथेच आज ६ हजार २३० रु. प्रतिक्विंटल असा दर आहे. मागील पाच दिवसांपूर्वी म्हणजे ( दि. २ ) जुलै ६ हजार ५४० असा होता. ३ जुलै ६ हजार ४७०, ५ जुलै ६ हजार ४४०, ६ जुलै ६ हजार ३२० आणि आज ७ जुलै ६ हजार २३० पाच दिवसात तब्बल प्रतिक्विंटल ३१० रु. इतके दर घसरले आहेत. दोन-चार दिवस दरवाढ झाली की, पुन्हा पंधरा दिवस घसरण होते. हे सततचे चढउतार पहाता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विकावे की, ठेवावे या दुविधेत शेतकरी आहेत. दर वाढण्याऐवजी घसरत असल्यामुळे विकताही येत नाही. ठेवावं तर दरवाढ होईल का ? नाही हे ही समजतं नाही. आतापर्यंत सोयाबीन सांबाळल्याने वजन कमी झाले.त्यात दरही कमी त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागणार? असे चिन्ह दिसत आहेत.