….या २८ मंडळांना मिळणार विमा ॲग्रीम !
विमा कंपनीने १२ ऑक्टोबरला पत्र पाठवून कळविल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

लोकगर्जना न्यूज
बीड : पावसाने ताण दिल्याने सोयाबीनचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करुन जिल्हाधिकारी यांनी प्रथम १६, दुसरं १० आणि २१ असे ४७ महसूल मंडळांची २५% विमा ॲग्रीमच्या ती अधिसूचना काढलेल्या आहेत. परंतु विमा कंपनीला १९ मंडळांचे नुकसान मान्य नाही. त्यामुळे ( दि. १२ ) रोजी विमा कंपनीने जिल्हाधिकारी,बीड यांना पत्र पाठवून २८ महसूल मंडळांना ॲग्रीम देण्याचा कंपनी विचार करत असल्याचे कळवले आहे. त्यामुळे २८ मंडळांना विमा ॲग्रीम मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
ऑगस्ट महिन्यात पुर्ण बीड जिल्ह्यातच पावसाने दडी मारली होती. तब्बल २४ ते २५ दिवस पाऊस नसल्याने फुलोरा व शेंग पापडी अवस्थेत पाण्याचा ताण आल्याने फुले,शेंगा गळून गेल्या, हलक्या रानातील सोयाबीन करपून गेलं यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून रॅंडम सर्वे झाले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्ह्यातून आलेल्या सर्वेतील अहवालानुसार प्रथम १६, दुसरं १०, तिसरे २१ असे एकूण ४७ महसूल मंडळांची २५% विमा ॲग्रीमसाठी निवड झाली. याची वरील प्रमाणे तीन अधिसूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी काढली. परंतु सुरवातीपासून विमा कंपनीचा या महसूल मंडळांना विरोध आहे. नेमकं किती मंडळांना ॲग्रीम रक्कम मिळणार? हा प्रश्न जिल्ह्यात कायम आहे. यापुर्वीही विमा कंपनीने पत्र पाठवून २६ महसूल मंडळांना ॲग्रीम देणार म्हटल्याच्या बातम्या आहेत. यानंतर पेरा आणि विमा काढण्यात आलेल्या क्षेत्रफळात तफावत असल्याचे विमा कंपनीने प्रशासनाला कळविले असल्याचेही बातम्या होत्या. हे पहाता ॲग्रीम मिळणार की, नाही? असा सामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. याचे ठाम उत्तर अद्याप कोणीही देतं नाही. परंतु ( दि. १२ ) ऑक्टोबर रोजी विमा कंपनीने जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलं आहे. त्या पत्रात विमा कंपनी म्हणते की, ९, १२, १४ अधिसूचनेनुसार तुम्ही ४८ महसूल मंडळे पावसाने ताण दिल्याने धोक्यात आलेली असल्याचे म्हटले आहे. परंतु यातील १९ महसूल मंडळांमध्ये ३० ऑगस्ट पर्यंत सलग ३ ते ४ आठवडे पावसाने ताण दिलेलं नाही. म्हणजे ( कोरड ) नाही. त्यामुळे ही १९ महसूल मंडळ पात्र नाही. यासाठी वापरलेले पर्जन्यमानाची आकडेवारी AWS ( ए. डब्ल्यू एस ) अधिसूचित व राज्य सरकारच्या महावेद प्रकल्पांतर्गत प्रकाशित आकडेवारी वरुन घेतल्याचा उल्लेख पत्रात आहे. तसेच उर्वरित २८ महसूल मंडळांना विमा ॲग्रीम २०२२ देण्याचा कंपनी विचार करत आहे. असे म्हटले असल्याने विमा ॲग्रीम जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांना मिळणार असे दिसून येत असले तरी पात्र शेतकऱ्यांची ओळख कंपनीच्या प्रक्रियेनुसार पटल्यानंतर विमा रक्कम खात्यावर टाकण्यात येणार आहे असे ही सदरील पत्रात म्हटलं आहे.
* २ अन् ५ मि.ली. पाऊस पडला तरी कोरडा दिवस नाही!
जिल्हाधिकारी यांनी पावसा अभावी नुकसान झालेल्या ४७ महसूल मंडळांची २५% ॲग्रीमसाठी अधिसूचना काढली होती. परंतु या पत्राच्या नुसार १९ महसूल मंडळ यामुळे पात्र ठरले नाहीत की, येथे सलग ३ ते ४ आठवडे कोरडे गेले नाही. परंतु याकाळात २ आणि ४ मि.ली. पाऊस झाला तो दिवस ही कोरडा धरण्यात आलेला नाहीये असे म्हटले जात आहे. या पावसामुळे पिकांना फायदा होतो का? विमा कंपनीने तांत्रिक विचार न करता शेतकरी व पिकांचा विचार करावा असे मत व्यक्त केले जात आहे.
* या मंडळांना मिळणार ॲग्रीम
नेकनूर, पिंपळनेर, लिंबागणेश, धानोरा, पिंपळा,जातेगाव, मादळमोही, चकलंबा, माजलगाव, किट्टी आडगाव, तालखेड, नित्रुड, अंबाजोगाई, घाटनांदूर, हनुमंत पिंपरी, सिरसाळा, येळंबघाट, घाटसावळी, चऱ्हाटा, दादेगाव, काळेगाव, मंजरथ, उजणी, चिंचोलीमाळी, मस्साजोग, मोहा, अंमळनेर, कुसळंब या महसूल मंडळांना विमा कंपनी ॲग्रीम देणार आहे.