अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न प्रकरणी फरार आरोपी जेरबंद
केज पोलीसांची कामगिरी; सहा महिन्यांनंतर आरोपी जाळ्यात

केज : शेळ्या सांभाळणाऱ्या अल्पवयीन मुलीला एकटी असल्याची संधी साधून नात्यातील नराधमाने बळजबरीने अत्याचार केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याची समजताच विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील फरार आरोपीला केज पोलीसांनी सापळा रचून शिताफीने जेरबंद केले.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शेतात शेळ्या चारताना सोबत कोणीही नसल्याची संधी साधून नात्यातील नराधमाने तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले. यातून सदरील मुलगी गरोदर राहिल्याचे समजताच त्या नराधमाने तीला विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा घडलेला प्रकार पीडितेने आई-वडिलांना सांगितला ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आई-वडिलांच्या पाया खालची जमीन सरकली. स्वतः ला सावरत त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून नराधमाच्या विरोधात तक्रार दिली. त्यावरुन पोलीसांनी आरोपी विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, बाल लैंगिक अत्याचार पोक्सो सह आदी कलमानुसार ( दि. २ सप्टेंबर ) गुन्हा दाखल केला. तेव्हा पासून आरोपी फरार होता. केज पोलीसांना रविवारी ( दि. २७ मार्च ) ला आरोपी केज येथे येणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली. त्यावरून एपीआय शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, महिला पोलीस पाचपिंडे रुक्मिणी, कागदे शिवाजी, एएसआय सय्यद यांनी सापळा लावला व मोठ्या शिताफीने नराधमाला जेरबंद केले. पोलीसांच्या या कारवाईच कौतुक करण्यात येत आहे.