दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; दोन तरुण जागीच ठार

माजलगाव : दोघं दुचाकीवरून माजलगाव कडे चालले होते. या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले. घटना तेलगाव-माजलगाव रस्त्यावर लहामेवाडी पाटी जवळ गुरुवारी ( दि. २० ) रात्री ९ च्या सुमारास घडली. या रस्त्यावरील वाढते अपघात पहाता चिंता व्यक्त केली जात आहे
तेलगाव येथून दोघे डबलसीट दुचाकी क्रं. एम.एच. ४४ डब्ल्यू ९६६८ वर माजलगावकडे चालले होते. दरम्यान लहामेवाडी पाटी जवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघे रस्त्यावर आदळले. धडक देणाऱ्या वाहन चालकाने मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात येताच धाव घेतली असता दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. नागरिकांना पोलीसांना माहिती दिली. माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविले. पुढील तपास सुरू आहे. मयत राजेंद्रसिंह बन्सीलाल राजपूरे ( वय २६ वर्ष ) रा. चाकरण राजस्थान, मनिषकुमार सोनी ( वय २२ वर्ष ) रा. काडवा, राजस्थान अशी नावे आहेत. हे दोघेही जागीच ठार झाल्याने धडक किती जोरात असावी याचा अंदाज येत आहे. सिमेंट रस्ता झाल्यापासून या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना येथे वाहतूक नियमांचे व वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.