शारदा स्कुल मध्ये पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांचे सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन

लोकगर्जनान्यूज
केज : सध्या लहान,थोर सर्वांकडे स्मार्टफोन आले असल्याने सायबर क्राईम वाढलं आहे. या चूका विद्यार्थ्यांकडून घडु नये म्हणून बुधवारी ( दि. १ ) बीड सायबर पोलीस ठाणे प्रमुख पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या बाबतीत सविस्तर माहिती देऊन या पासून वाचण्यासाठी काय करावे? याची सोप्या भाषेत माहिती दिली.
मोबाईल फोन आज गरज बनली तशी अडचणही बनली आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन आले असल्याने मुलंही याकडे आकर्षित होत आहेत. ते पालकांचे मोबाईल घेऊन त्यावर सोशल मीडिया अकाउंट करणं त्यामध्यमातून कोणाची बदनामी करणे, अश्लिल फोटो, व्हिडिओ प्रसारित करणे, मुलींची छेड काढणं असे प्रकार घडत आहेत. तसेच ऑनलाईन चोरटे मोठ्या प्रमाणात सक्रीय आहेत. ते काहीही आमिष दाखवून, खोटं बोलून, एखादी महाग वस्तू स्वस्तात विकत असल्याचे सांगून बँक खाते रिकामे करत आहेत. यांना ओळखने खूप अवघड आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करु नये. त्यांनी ओटीपी, एटीएम, बँक खातं,मेल आयडी विचारलं तर माहिती देऊ नये. तसेच त्यांच्याशी बोलणं टाळावं तसेच सर्वं विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनाही माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले. यावेळी प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.