आडसकरांची गांधीगिरी
सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने केला महावितरणच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सत्कार

लोकगर्जनान्युज
आडस : येथे सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या ग्राहकांनी एकत्र येऊन गांधीगिरी आंदोलन करत महावितरणचे कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी कनिष्ठ अभियंता यांनी यापुढे तक्रारीची वेळ येऊ देणार नाही असे आश्वासन दिले. पण वरीष्ठ कार्यालयाकडून काहीच साहित्य मिळत नसल्याची धक्कादायक माहिती चर्चेतून समोर आल्याने महावितरण कंपनीचे धोरण ग्राहक आणि खालील अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मरण असे दिसून येत आहे.
तेलगाव आणि धारूर ते आडस दरम्यान वीज वाहिनीत नियमित बिघाड होतो. यामुळे येथील ३३/११ के.व्ही. केंद्र बंद पडत असल्याने परिसर अंधारात बुडून जाते. या दुरुस्तीसाठी कधी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. तोपर्यंत येथे अंधार असतो. सध्या उन्हाळा सुरू असून सुर्य आग ओकत असल्याने उष्णता वाढली आहे. याकाळातही सतत वीजपुरवठा खंडित रहात आहे. यामुळे जिवाची लाहीलाही होत आहे. बिघाड लवकर दुरुस्त होत नाही. यामुळे ऐन उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागतो आहे. तासभरही वीजपुरवठा सुरळीत चालू रहात नाही. यामुळे त्रस्त वीजग्राहकांनी एकत्र येत येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता, कर्मचारी यांचा सत्कार करुन गांधीगिरी केली. यावर कारभार नाही सुधारला तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आडसकरांनी दिला. महावितरण कंपनीकडून कोणतेही साहित्य मिळत नसल्याचे चर्चेतून समोर आले. विविध कामांसाठी नेमलेल्या कंपन्या नेमकं काय काम करतात? याचा शोध घेण्याची गरज असून, वरीष्ठ आणि कंपन्यांचे साटेलोटे असल्याने बिले निघतात पण कामाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे चित्र आहे. या महावितरणच्या धोरणांमुळे वीज ग्राहक आणि खालील अधिकारी अन् कर्मचारी बेजार असल्याचे दिसून येत आहे.