उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत हवीय; जाणून घ्या सोपी पद्धत
एक मिस्ड कॉल करा अन् फॉर्म मिळवा

लोकगर्जनान्यूज
अनेक दुर्धर आजार व शस्त्रक्रियांसाठी राज्यातील रुग्णांना महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री सहाय्यता आरोग्य कक्षातून मदत करतात. परंतु हा अर्ज कुठे मिळतो,मग भरुन तो कुठं द्यावं लागतं, का मुंबईला जाऊन मुख्यमंत्री कार्यालयात ही सर्व प्रक्रिया करावी लागते असे एक ना अनेक प्रश्न पडतात. मदत मिळणं आवश्यक आहे अन् काही माहिती ही नाही. त्यामुळे रुग्ण व नातेवाईक यासाठी परेशान असतात. परंतु आता ही बातमी सेव्ह करुन ठेवा व गरज वंताना पाठवा. उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवायची असेल तर फक्त एक मिस्ड कॉल करा. तो फॉर्म आला की, भरुन पाठवा तो कूठे कसा? पाठवायचा यासाठी ही बातमी पुर्ण वाचा.
विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. ही मदत रुग्णांना तातडीने मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मिस्ड कॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आतापर्यंत तब्बल 60 कोटींवर मदतनिधीचे वाटप करण्यात आले. दर महिन्याला दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होत असतात.
यासाठी आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज दाखल केल्यानंतर आठ दिवसात वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, हा अर्ज घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीच्या मंत्रालयातील कक्षापर्यंत पोहोचणे ग्रामीण भागातील जनतेला शक्य होत नाही. मुख्यमंत्री सहायता निधीतून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत अनेकदा रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाइकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून यावर तोडगा काढण्यात आला आहे. आता एका मिसकॉलवर हा निधी मिळणे शक्य होणार आहे. यासाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जनतेच्या हिताचा निर्णय
मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणाऱ्या मदतीचा अर्ज कुठे मिळतो? तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का? अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना अर्ज करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र, आता ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देताच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. जनतेसाठी ही मिसकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे.
अशी आहे प्रक्रिया
मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाईल क्रमकांवर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे मोबाईलवर येईल. त्या लिंकवर क्लिक करताच अर्ज डाऊनलोड होईल. या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज आवश्यक कागदपत्रांसह भरुन पोस्टाद्वारे किंवा स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर पाठवावा लागेल.
आता भाजलेल्या,करंट लागलेल्या व्यक्तींना मदत!
अनेक दुर्धर आजार, शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्रीपद सहायता निधीतून उपचारासाठी मदत दिली जाते. या योजनेचा लाखों रुग्णांनी लाभ घेतला आहे. परंतु मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रथमच भाजलेल्या, शॉक लागलेल्या रुग्णांना देखील प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. यामुळे याही रुग्णांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.