सोमवार नंतरही बीड जिल्ह्यातील शाळा बंदच

बीड : जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत असल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवारी उघडणार नाही. अशी सूचना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाला दिल्याचं सांगितलं जात आहे. परंतु १० ते १२ चे वर्ग सुरू होणार असून प्राथमिक शाळांना कुलुप उघडण्यासाठी शुक्रवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
राज्यातील शाळा ( दि. २४ ) सोमवार पासून उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. परंतु परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनास निर्णय घेण्याचा अधिकार दिला. बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे . आज बीड तालुक्यात ११३ तर पुर्ण जिल्ह्यात २९५ इतकी बाधितांची संख्या आहे. हे वाढते रुग्ण पहाता प्रशासन सावध पवित्रा घेत असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाशी चर्चा केली. या चर्चेअंती वाढता कोरोना संसर्ग पहाता सोमवारी जिल्ह्यातील शाळा उघता येणार नसल्याचे शिक्षण विभागाला सांगितले आहे. संसर्गाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन शुक्रवार नंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे . परंतु येत्या सोमवारपासून दहावी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.