सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी ग्रामऊर्जा फाउंडेशनची धडपड
वाडी, वस्ती व लहान गावात वाचन कट्टा उपक्रम सुरू

लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील अनेक गावांतील मुलं आई-वडील सोबत कारखान्यावर जातात. ऐन उन्हाळ्याची सुट्टी लागण्याच्या तोंडावर गावाकडे परत येतात. या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व ते शैक्षणिक प्रवाहात राहावे या उद्देशाने ग्रामऊर्जा फाउंडेशन ही संस्था धारुर तालुक्यातील काही गावात मागील तीन वर्षांपासून वाचन कट्टा उपक्रम राबवित आहे. तसेच जिल्हा परिषद शाळा सुधार सह गुणवत्ता सुधार मोहिम राबवित आहे.
यावर्षी ग्रामऊर्जा फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन धारूर तालुक्यातील आवरगाव, जायभायवाडी येथे वाचन कट्टा उपक्रमाची सुरवात केली आहे. हा उपक्रम गावातील सार्वजनिक ठिकाणी सुरु करण्यात आला आहे, या मध्ये 250 पुस्तकं, चित्र, गोष्टी, शेती, तंत्रज्ञान, जीवन कौशल्य, प्राणी, पक्षी अशी विविध माहिती असणारी पुस्तकं ठेवण्यात आली आहे. तसेच वर्तमानपत्र देखील ठेवण्यात आले आहेत. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक विद्यार्थी येथे येऊन आपल्या आवडीची पुस्तके वाचत असून, यामुळे ऊसतोडणी आणि उन्हाळी सुट्टी मुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आलेली उदासीनता दुर होऊन वाचन व शाळेची गोडी निर्माण होत आहे. तसेच गोष्टींचा पुस्तकांसह वर्तमानपत्र आणि शेती विषयक माहिती असलेली पुस्तके असल्याने मुलांचे पालकही वाचन कट्टा वर येऊन वाचन करत आहेत. हा उपक्रम पुर्ण उन्हाळी सुट्टीच्या काळात धारुर तालुक्यातील 8 गावांमध्ये सुरू रहाणार आहे. अशी माहिती ग्रामऊर्जा फाउंडेशनने दिली आहे. या उपक्रमाचे धारुर तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.