पोळ्याच्या निमित्ताने सर्जा-राजाच्या साजाने बाजार फुलला
दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने ग्राहक गायब

लोकगर्जना न्यूज
बीड : अवघ्या सहा दिवसांवर पोळा हा सण आल्याने बैलांच्या साजाने बाजार फुलला आहे. पण यावरही महागाईचा परिणाम झाल्याने २० ते २५ टक्के साजाचे दर वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला असल्याने ग्राहकच नाहीत असे व्यापारी म्हणत आहेत. यंदा कोरोना संकट नसल्याने दोन वर्षांनंतर पोळा उत्साहात साजरा होईल असा अंदाज आहे.
पोळा म्हणजे हा खरा शेतकऱ्यांचा सण, वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस शेती कसण्यासाठी मदत करणारे शेतकऱ्याचे खरे सोबती सर्जा-राजाचा सण, शेतकरी पोळ्याच्या एक दिवस अगोदर आपल्या सर्जा – राजाची खांदा मळणी करुन मस्त आंघोळ घालून चकाचक करतात. पोळ्या दिवशी अंगावर झुल घालून, शिंगे रंगवून, कंबरपट्टा, रंगीबेरंगी फुले,फुगे, कवडी माळ, चंगाळे, घुंगरु, मोरकी, मटाटी, गोंडे, बाशिंग, शेंबी, फुगे व विविध रंगांच्या व प्रकाराच्या माळांनी सर्जा-राजांची सजावट करतात. गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. पूजा करुन पुरणपोळीचा नैवेद्य सर्जा-राजाला खाऊं घातला जातो. हा पोळा येत्या शुक्रवारी ( दि. २६ ) म्हणजे अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते. त्यामुळे दोन वर्ष शेतकऱ्यांनी शेतातच पोळा साजरा केला. यावर्षी कोरोना संकट नसल्याने सार्वजनिक कार्यक्रमांवर कसलेही बंधन नाहीत. त्यामुळे यंदाचा पोळा उत्साहात साजरा होईल असा अंदाज आहे. यामुळे अनेक व्याऱ्यांनी जनावरांच्या सजाचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहेत. पोळा जवळ आल्याने शनिवार ( दि. २० ) आडसचा आठवडी बाजार या साजाच्या दुकानांनी बाजार फुलून गेला असल्याचं दिसून आलं. तर यंदा इंधन दरवाढ तसेच जीएसटी यामुळे हा साजही महागला आहे. जवळपास २० ते २५ टक्क्यांनी दर वाढल्याची माहिती साज विक्रेते सचिन थोरात, विनोद सोनी यांनी सांगितले. वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांनी जनावरांच्या खरेदीसाठी आणखी हात मोकळा सोडला नाही. त्यामुळे सध्यातरी साज खरेदीसाठी म्हणावी तशी गर्दी नाही. परंतु पोळ्याच्या एक ते दोन दिवस अगोदर विक्री वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.