सफरचंदाचा व्यापारी भासवून दिल्लीच्या एकाने केजच्या व्यापाऱ्याचे पावणेसहा लाख लुबाडले फेसबुक जाहिरातीवरील विश्वास ठेवणे पडले महागात

केज : फेसबुकवर सफरचंदाची जाहिरात पाहून संबधितास केज येथील फळांच्या व्यापाऱ्याने संपर्क केला. त्यांच्यात चॅटिंग व फोनवरून संभाषण सुरू झालं. दिल्लीच्या ठगाने विश्वास जिंकून दोन ट्रक सफरचंद पाठवत असल्याचे सांगून व माल भरत असल्याचे ट्रकचे फोटो व्हाट्सअप वर टाकून तब्बल पावणे सहा लाख रुपये लुबाडल्याची घटना समोर आली. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
गफ्फार सत्तार बागवान रा. केज यांचे बसस्थानकाच्या मागे सिमला फ्रुट कंपनी नावाचा ठोक फळ विक्रीचा व्यापार आहे. ते विविध ठिकाणांहून ट्रकने फळ मागवून केज, धारुर, आडस, कळंब,नेकनूर सह आदि ठिकाणीच्या किरकोळ विक्री करणाऱ्या फळ विक्रेत्यांना माल पुरवितात. फेसबुकवर सफरचंदाची जाहिरात पाहून जवळपास दीड महिन्यांपूर्वी सबंधितास संपर्क केला. त्याने शादाब नाव असल्याचे सांगितले. सफरचंदाचे दर, गाडीभाडा सह विविध चर्चा झाली. त्यांने अत्यंत माफक दर सांगत गफ्फार बागवान यांचा विश्वास संपादन केला. योग्य दरात माल मिळतं असल्याने गफार यांनी शादाब यास एक ट्रक सफरचंद पाठविण्यास संगीतले. त्याने भाडे व मालाचे पैसे पाठविण्यास सांगितले आणि ट्रक क्रं. (डी एल-०१/डब्ल्यू ०७७७) मध्ये माल भरत असल्याचे फोटो व्हाट्सअपवर पाठविले. तसेच दिल्ली फ्रुट कंपनी नावाचे बिल क्र. १०१२ आणि त्यापोटी ४ लाख ३५ हजार रु. पाठवा असे सांगितले. गफार यांनी त्याने सांगितलेल्या एजाज नावाच्या व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यावर ४ लाख रु. ऑनलाइन पद्धतीने जमा केले. दि ३० डिसेंबर रोजी शादाबने गाडी केजकडे निघाली असून उर्वरित ३५ हजार रु. पाठवा असा फोन केला. पुन्हा गफार बागवान यांनी २५ हजार रु. पाठविले. त्या नंतर ३१ डिसेंबर रोजी दिल्लीच्या शादाब याने फोन करून भाव कमी आल्याने दुसरी आणखी एक ट्रक पाठवितो असे म्हणाला. गाडी भाड्यापोटी ४० हजार रु पाठविले. नंतर त्याने ट्रक क्र. (युपी-२५/ सिटी-०९६८) चे फोटो पाठवून २ लाख रु. ची मागणी केली.शादाबने सांगितलेल्या खात्यावर गफार बागवान यांनी ( दि. १ )जानेवारीला १ लाख रु. पाठविले. त्यानंतर राजीव नावाच्या ट्रक ड्राइयव्हरने फोन करून आम्ही महाराष्ट्र बॉर्डरवर आलो आहोत,परंतु ट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगितले त्यामुळे ट्रक दुरुस्ती साठी पुन्हा १० हजार रु पाठविले. पण सफरचंद घेऊन येणारे ट्रक केजला आलेच नाहीत. उशीर लागतोय म्हणून गफार बागवानयाने शादाब व्यापारी, ट्रक चालक, ट्रान्सपोर्ट यांना फोन केले परंतु कोणीही फोन उचलला नाही. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे समजताच दि. २९ जानेवारी रोजी गफार बागवान यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या वरून दिल्ली येथील कथित फळ विक्रेता शादाब, ट्रक चालक राजीव व मनीष, एजाज यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं २६/२०२२ भा दं वि ४२०, ४०६ आणि ३४ नुसार संगणमताने विश्वासघात करून पावणे सहा लाख रु. ठकवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.