सततच्या पावसामुळे नुकसान;मागणी 400 कोटींची शासनाने दिले इतकेच?

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे 400 कोटींची मागणी केली. शासनाने अद्याप पर्यंत तीन वेळा घोषणा केली पण पदरात काहीच नाही. परंतु आता शासनाने रक्कम दिली असून ती मागणीच्या अर्धी ही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला शासनाने पाने पुसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात काढणीला आलेलं सोयाबीन व वेचणीस आलेल्या कापसाच्या वाती अन् सोयाबीनला करे फुटून सततच्या पावसामुळे 4 लाख 37 हजार 688 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रथमच तत्कालीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी म्हणून शासनाकडे 800 कोटींची मागणी केली. यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 400 कोटींची मागणी होती. जिल्हाधिकारी यांचा अहवाल जाताच शासनाने मदत करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तीन वेळा घोषणाही केली. परंतु पदरात काहीच पडत नसल्याचे पाहून शेतकरी फक्त मदतीची वाट पहात होते. मागील काही दिवसांपूर्वी शासनाकडून सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 1500 कोटींच्या अनुदानाची घोषणा केली. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु हे अनुदान येणार कधी? हे स्पष्ट नव्हतं. अखेर शासनाने सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दिले असून बीड जिल्ह्यासाठी 195 कोटी दिले असल्याचे वृत्त आहे. मागणी 400 कोटींची अन् मिळाले 195 कोटी ही मागणीच्या अर्धीही रक्कम नाही. यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शासनाने मागणी प्रमाणे 400 कोटी मंजुर करावेत अशी मागणी केली जात आहे.