सकारात्मक: बीड जिल्ह्यातील आदर्श पाऊल उचल घेऊन ऊसतोड मजुरांनी बांधली ३२ लाखाची शाळा इमारत

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्हा परिषद शाळा म्हणजे सरकारी त्यासाठी काय ते सरकार करेल असे म्हणणारे अन् सरकारी निधी आला तरी कागदावर खर्च दाखवणारे या दोन्ही प्रकारचे महाभाग पावलोपावली मिळतील पण उपजिविका भागविण्यासाठी ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. परंतु तुमचे मुलं ही ऊसतोड मजुर करायचे का? नसेल तर शिक्षणाकडे लक्ष द्या म्हणताच कारखान्याची उचल घेऊन लोकवर्गणीतून ३२ लाख रुपये जमवून गावात शाळेची टोलेजंग इमारत बांधणारे कुठे तरीच दिसतात.हे गाव बीड तालुक्यातील पोखरी ( घाट ) आहे.
बीड तालुक्यातील पोखरी ( घाट ) हे ८० टक्के ऊसतोड मजुरांचे गाव आहे. जमिनी हलक्या प्रतीच्या म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. जिल्ह्यातही औद्योगिक विकास नसल्याने उपजिविका भागविण्यासाठी ऊसतोडणी शिवाय पर्याय नाही. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता सातवी पर्यंत शाळा आहे. परंतु पुरेशा वर्ग खोल्या नसल्या कारणाने दोन-तीन वर्ग एकाच खोलीत भरवावे लागत असे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वेळा जिल्हा परिषदेकडे वर्ग खोल्या साठी निधीची मागणी केली परंतु ती काय पुर्ण होईना. मग शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी पालकांची बैठक घेऊन तुमच्या मुलांच्याही हातात ऊसतोडणीचा कोयताच द्यायचं का? असा प्रश्न उपस्थित केला. जर मुलांच्या हातातील कोयता सोडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे आवाहन केले. यास पालकांनी पाठींबा दिला. यानंतर सर्व ग्रामस्थांनी मिळून पाटोदा तालुक्यातील जरेवाडी येथील आदर्श शाळेला भेट देवून पाहाणी केली. गावात परत येताच शाळा इमारतीच्या बांधकामासाठी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला. कामाला सुरुवात झाली. अनेकांनी कारखान्याची उचल घेऊन शाळेसाठी वर्गणी दिली. पहाता पहाता तब्बल २७ लाख रुपये जमा झाले. शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. परंतु मध्येच पुन्हा पैशाची कमतरता भासू लागली. पुन्हा लोकवर्गणीतून ५ लाख रुपये जमा झाले. असे एकूण ३२ लाख रुपये जमा झाले. यातून शाळेची ५ खोल्या अन् कार्यालय अशी टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. लोकवर्गणीतून शाळा बांधणारे गाव म्हणून पोखरी पुढे आले. मनाची श्रीमंती काय असते? आपल्या कृतीतून दाखवून दिले. इमारतीचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं असतांनाही जनतेचे कयवारी म्हणून उसने अवसान आणणाऱ्या एकाही पुढाऱ्याने यासाठी फुटकी कवडीही दिल्याचे अद्याप ऐकण्यात किंवा वाचण्यात आले नाही.
*जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांची घेतली ग्रामस्थांनी भेट
३२ लाख खर्च करूनही इमारत पुर्ण होण्यासाठी आणखी पैसा लागणार आहे. यामुळे पोखरी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी समाधान व्यक्त करत निधीची तरतूद करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच यासाठी बैठकही लावल्याचे डॉ.गणेश ढवळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून कळलं आहे.
*मुख्याध्यापक, शिक्षकांनी केली मदत
ग्रामस्थांनी शाळा इमारतीसाठी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात करताच शिक्षकांनीही यात सहभागी होऊन मुख्याध्यापक यांनी एक महिन्याचा पगार दिला. शिक्षकांनी प्रत्येकी २१ हजार आपला वाटा दिला आहे.