
लोकगर्जना न्यूज
पाटोदा : जनावरे चारत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बेदरवाडी ( ता. पाटोदा ) येथे शुक्रवारी दुपारी घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. जनावरे पळत आल्याने बिबट्याने पळ काढला व शेतकऱ्याचे प्राण वाचले.
आण्णासाहेब खंडू काकडे रा. बेदरवाडी ( ता. पाटोदा ) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते शुक्रवारी ( दि. ७ ) दुपारी आपल्या शेतात जनावरे चारत होते. यावेळी अचानक बिबट्याने हल्ला चढवला. अचानक हल्ला केल्याने घाबरून गेलेले आण्णासाहेब जिवाच्या आकांताने ओरडू लागले. जवळपास कोणीही नसल्याने लवकर मदत मिळाली नाही. परंतु आपल्या मालकावर हल्ला चढवलेला व ते आरडाओरडा करत असल्याने जनावरे त्यांच्या दिशेने पळत सुटले. जनावरांचा झुंड येताना पाहून बिबट्याने आण्णासाहेब यांना सोडून पळ काढला. आण्णासाहेब काकडे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू असून काही दिवसांनी कापूस वेचणीला सुरुवात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कामे करताना दक्ष राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.