शेतकऱ्यांना फटका; सोयाबीन उगवले नाही
बियाणे दोष की, वातावरणाचा परिणाम कृषी विभागाने मार्गदर्शनाची मागणी

आडस : केज तालुक्यातील आडस येथे शेकडो शेतकऱ्यांचे पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागल्याने मोठा फटाका बसला आहे. हा वातावरणाचा परिणाम आहे की, बियाणांचा दोष याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
यंदा पाऊस चांगला असल्याचं अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. यामुळे आनंदी असलेल्या शेतकऱ्यांनी जून महिना उजडण्याधी शेतीची मशागत करुन शेती पेरणी योग्य केली. घरातील किडुकमिडुक विकून, उसनवारी करुन खत,बी-बियाणे खरेदी केली. परंतु पेरणी योग्य पाऊसच झाला नाही. कसाबसा जूनच्या शेवटच्या आठवड्यात आडस परिसरात चांगला पाऊस झाला. यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली. पेरणी नंतर दोन-तीन दिवस सतत पाऊस होता. यानंतर तीनचार दिवस पावसाने उघडीप दिली. पेरणी करुन सहा दिवस उलटले तरी सोयाबीन बियाणे उगवले नाही. यामध्ये बालासाहेब बाबुराव ढोले ४ बॅग, कांताबाई प्रकाश शेंडगे ३ बॅग, नितीन बाबुराव शेंडगे ३ बॅग, नागनाथ प्रभुअप्पा आकुसकर ३ बॅग यांसह शेकडो शेतकऱ्यांचे तक्रारी आहेत. यात अनेक शेतकरी घरातील बियाणे पेरणारेही आहेत. महागा मोलाचं बियाणांची माती झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हा परिणाम नेमका वातावरणातील बदलांचा आहे की, बियाणांचा दोष आहे. याबाबतीत कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे. कापूस लावावं तर उतार नाही आणि सोयाबीन पेरले तर उगवत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावं तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.