शेतकऱ्यांचा एल्गार! दुष्काळ प्रश्नी धारुर, युसुफ वडगाव येथे आंदोलन

लोकगर्जनान्यूज
केज / किल्लेधारुर : पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. परंतु केज व धारुर तालुक्याला २५ टक्के अग्रीम मधून वगळण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झाले. शासनाच्या विरोधात केज व धारुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन सर्व महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करा यासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन केले.
धारुर तालुक्यात शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, पीकविमा व अनुदान द्यावे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक धारुर येथे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाचा निषेध करत तब्बल चार तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये धारुर तालुक्यातील चारही महसुल मंडळातील हजारो शेतकरी तसेच सर्व पक्षीय नेते सहभागी होते. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले असून येत्या ५ तारखेला आयोजित बैठकीत धारुर तालुक्याला अग्रीम मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
केज : युसुफ वडगाव
अशीच परिस्थिती केज तालुक्याची असून शेतकऱ्यांनी तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्याची व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई म्हणून प्रति शेतकरी ५० हजार अनुदान देण्यात यावे, मांजरा धरणावरील शेती पंपाचे तोडण्यात आलेले विज कनेक्शन तोडण्यात यावेत या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.