
बीड : दारुच्या नशेत झालेल्या भांडणात नाकावर बुक्की मारल्याच्या रागातून झोपेत असलेल्या मजुराच्या डोक्यात दगड घालून सहकाऱ्याने खून केल्याची घटना ढेकणमोह ( ता. बीड ) येथे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. एका आरोपीच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सुरू असून या कामावर पश्चिम बंगाल येथील मजुर आलेले आहेत. ते ढेकणमाह येथे रहातात. शुक्रवारी ( दि. २५ ) रात्री सिमुल बिस्वास पिता निपेंद्रनाथ बिस्वास आणि हैदरआली तरफदार पि. अब्दुल होसाईन या दोघा मजुरांमध्ये दारुच्या नशेत भांडण होऊन किरकोळ मारहाण झाली. याचा राग मनात धरून सिमुल बिस्वास याने रात्री २ वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या हैदरआलीच्या डोक्यात दगड घालून ठार केले. स्वतः गुत्तेदाराला हैदरालीचा खून केल्याच सिमुल बिस्वास याने सांगून गुन्हा कबूल केला. यानंतर गुत्तेदाराने पिंपळनेर पोलीसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पिंपळनेर पोलीसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुत्तेदार सुशांत मंडल यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला. या घटनेने मात्र ढेकणमोह परिसरात खळबळ उडाली आहे.