आपला जिल्हा

शहीद जवान उमेश मिसाळ यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

शहीद जवान अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असताना सुरतगड येथे सेवा बजावताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यांच्यावर शासकीय इतमामात जन्मगावी कोल्हेवाडी येथे अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद‌ जवान अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. अखेरचा निरोप देण्यासाठी केज तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार प्रीतम मु़ंडे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाने मानवंदना दिली.

कोल्हेवाडी ( ता. केज ) गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ वय (२३ वर्ष) हे भारतीय सैन्य दलात २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतगढ येथे सेवा बजावत होते. ( दि. २६ ) सोमवारी सकाळी त्यांचे विजेचा शॉक लागून अपघाती निधन झाले. सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळचे पार्थिव घेऊन ( दि. २७ ) मंगळवारी रात्री १२:३० नंतर दिल्ली येथून विमानाने पुणे येथे पोहोचले. आज बुधवारी ( दि. २८ ) सकाळी ८:३० वा. मूळगावी केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथे पोहोचले. त्या नंतर फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या पार्थिव देहाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उमेश मिसाळ अमर रहे आणि भारत माता की जय च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकलेला होता. तसेच रस्त्याच्या दुतर्फा जिल्ह्यातील नागरिकांनी उभे राहून उमेश याचे अंतिम दर्शन घेत त्याच्यावर फुलांची उधळण केली. पार्थिव दर्शनासाठी काही वेळ त्यांच्या पत्र्याच्या शेडवजा घरा समोर ठेवण्यात आले. यावेळी बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितम मुंडे, तहसीलदार एम जी खंडागळे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला मोराळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, भाजपचे अक्षय मुंदडा, २५ मराठा इन्फन्ट्रीचे सुभेदार सुधाकर कुटाळ, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, माजी सैनिक संघटनेचे प्रा. हनुमंत भोसले, मेजर अजिमोद्दीन इनामदार पत्रकार महसूल कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी, पंचायत समितीची अधिकारी व कर्मचारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
त्या नंतर पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. नंतर वडील नरसू मिसाळ यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.
उमेश मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.
दहा महिण्यात प्रतिक्षाला आले वैधव्य
उमेश आणि प्रतीक्षा यांचा विवाह दहा महिन्या पूर्वी २९ ऑगस्ट २०२२ रोजी झाले होते आणि अवघ्या दहा महिन्यातच प्रतीक्षा हिला वैधव्य आले.
उमेश येणार म्हणून सर्व कुटुंब खुषीत होतं
दि. २६ जून रोजी उमेश यांनी पत्नी प्रतिक्षा यांना फोन करून गावी येणार आहे. रजा मंजूर झाली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होतं. परंतु सोमवारी अपघाताची माहिती मिळाली अन् हा आनंद दुःखात बदललं. तो आलाही परंतु तिरंग्यात, यावेळी आई व पत्नीने फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे मन भरुन आले. डोळे पाणावले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »