खळबळजनक; ११ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; गेवराई शहरातील घटना

बीड : शाळा सुटल्यानंतर घरी चाललेल्या ११ वर्षीय मुलाचा ओमिणी मध्ये आलेल्या अज्ञात इसमांनी तोंडात बोळा घालून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही जागरुक नागरिकांना संशय आल्याने सदरील स्कॉर्पिओचा पिच्छा केला असता त्यांनी मुलाला सोडून पळून गेले यामुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. परंतु या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील बागवान अनस हाफिजोद्दीन ( वय ११ वर्ष ) हा मुलगा द.बा. घुमरे विद्यालयात इयत्ता ६ च्या वर्गात शिकत आहे. आज शुक्रवारी ( दि. ८ ) दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर कोल्हार रोडवर असलेल्या आपल्या घरी जात होता. दरम्यान तो नगर पालिकेच्या स्टेडियम जवळ आला असता ओमिणी मध्ये आलेल्या अज्ञात इसमांनी अनस याचे तोंड दाबून गाडीत ओढले व त्याच्या तोंडात कपड्याचा बोळा घालून वाहन औरंगाबाद रस्त्याने घेऊन गेले. शहराच्या बाहेर जमादारनी पुला जवळील एका बियर बार वर दारु घेण्यासाठी गाडी थांबवली. यावेळी गाडीतून उतरलेल्या इसमाच्या हलचालीवर संशय आल्याने काही नागरिकांनी गाडीत डोकावून पाहिले असता आतमध्ये तोंड दाबलेला मुलगा दिसला. अधिकच संशय बळावला असता त्यांच्याकडे चौकशी केली असता स्थानिक नागरिक व अपहरणकर्त्यांमध्ये झटापट झाली. जास्त लोक येतील म्हणून त्या मुलाला फेकून अपहरणकर्त्यांनी वाहनासह पळ काढला. नागरिकांच्या जागरुक्तेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. परंतु या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे. अपहरणकर्ते हे वेगळीच भाषा बोलत असल्याने ते परराज्यातील असण्याचा अंदाज आहे. बागवान यांचेही कोणाशी वैर अथवा भांडण नाही मग अपहरणाचा प्रयत्न का झाला? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.