वीज प्रश्न पेटला! केज तालुक्यातील या ठिकाणचे शेतकरी घेणार जलसमाधी!

लोकगर्जनान्यूज
केज : येथील ३३ केव्ही केंद्रातील १० एमव्हीएचा मुख्य रोहित्र जळाल्याने मागील ९ महिन्यांपासून शेतीचा वीजपुरवठा बंद असल्यात जमा आहे. रब्बी हंगाम तोंडावर असून वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे सोनी जवळा येथील वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर जिल्ह्यातील कोणत्याही तलावात शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
केज येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीएचा मुख्य रोहित्र जळाला असल्याने तात्पुरती व्यवस्था म्हणून विद्युत जोडणी केली. परंतु ती दिवसात एक किंवा अर्धातास वीज सोडण्यात येते. याला तब्बल ९ महिने झाले असल्याने येथील शेतीचा वीजपुरवठा बंद असल्यासारखा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यापुर्वीही वीजपुरवठा सुरळीत करावा म्हणून गावात उपोषण करण्यात आले. त्यावेळी काही दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु काहीही सुधारणा नाही. आता रब्बी हंगाम तोंडावर आहे. जर वीजपुरवठा सुरळीत नाही झाला तर रब्बी पिके हाती लागणार नाहीत. आधीच परतीच्या पावसाने खरीपाची पिके गेली आहेत. रब्बीची पिके वीज पुरवठ्यामुळे गेले तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. तसेच शेतातील अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत असून त्या डोक्याला लागतात. लोंबकळणाऱ्या तारांमुळे सतत वीजपुरवठा खंडित होतो. याची दुरुस्ती करण्यात यावी व शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा ( दि. १४ ) नोव्हेंबर रोजी सोनी जवळा येथील सर्व शेतकरी जिल्ह्यातील कोणत्याही तलावात जलसमाधी घेतील असा इशारा मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील निवेदनावर ६३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असे म्हटले आहे. सदरील निवेदन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, व्यवस्थापक, महावितरण कंपनी मुंबई, जिल्हाधिकारी बीड, अधीक्षक अभियंता, महावितरण, कार्यकारी अभियंता, महावितरण, तहसीलदार, पोलीस ठाणे सह आदींना माहितीस्तव देण्यात आले आहे.