विडेकरांना जावई सापडला;रात्री दोन वाजता झोपेतच घेतला ताब्यात
थोड्या वेळात होणार गर्दभ स्वारी मिरवणूक सुरू

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विडा येथे धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 90 वर्षांची परंपरा आहे. धुळवड आली की, सर्व जावई भूमिगत होतात. रात्री उशिरापर्यंत जावायाच्या शोधात पथक फिरत होते. अखेर रात्री 2 वाजता जवळबन येथून झोपेत असताना जावई ताब्यात घेतला असून, काही वेळात गाढवावरून जावयाच्या मिरवणूकीला सुरुवात होईल
धुळवड एक दिवसावर येऊन ठेपली असल्याने विड्याचे सर्व जावई अलर्ट होते. मोबाईल बंद करून ते अज्ञात स्थळी होते. परंतु जावई शोधण्याची जबाबदारी असलेले तरुण मेव्हण्यांचे पथक रात्री उशिरापर्यंत भाऊजीच्या शोधात होते. पण भाऊजी काही हाती लागत नव्हते. अनेक ठिकाणी या पथकाने शोध सुरू ठेवला परंतु जावई काही हाती लागलं नसल्याने सर्व चिंतेत होते. अखेर रात्री दोन वाजता जवळबन ( ता. केज ) येथील जावई घरीच झोपेत असल्याची खबर लागली त्याच वेळी घरी जाऊन झोपेतच जावई पकडून विडा येथे घेऊन आले. यंदाचे गाढव स्वारीचे मानकरी जावई अविनाश करपे रा. जवळबन ( ता. केज ) हे असून ते युवराज पटाईत यांचे जावई आहेत. जावई मिळाल्याने काही वेळातच विडा येथे मिरवणूक सुरू होणार आहे.