वाहनाची धडक जि.प. शिक्षक ठार; धारुर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील घटना

लोकगर्जना न्यूज
रस्त्याने पायी चालत असलेल्या शिक्षकास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ( दि. २२ ) रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक दरम्यान घडली आहे. मागील काही दिवसांपासून धडक देऊन पळून जाणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हेही दाखल असून अद्याप पर्यंत एकही वाहन समोर आणण्यात प्रशासनाला यश आले नाही.
गणेश नागनाथ मिठेवाड ( वय ४० वर्ष ) असे अपघातातील मयताचे नाव असून, ते जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी ( दि. २२ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिठेवाड हे राष्ट्रीय महामार्गावरुन पायी चालत जाताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना वाहन चालकाने मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. परंतु घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मदत करत गणेश मिठूवाड यांना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यामुळे जागीच ठार झाले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने धारुर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.