शेतीचे तंटे मिटविण्यासाठी उपजिल्हाधिकारी ( SDM ) शरद झाडके यांचे म्हत्वाचे आवाहन
लाभार्थी शेतकऱ्यांना केवळ तीन हजार रूपये मुद्रांक-नोंदणी शुल्कः

लोकगर्जनान्यूज
केज : शेताचा बांध, शेतजमिनीचा ताबा,वहिवाटीबाबत पिढ्यान्पिढ्या शेतकऱ्यांमध्ये आपापसात वाद, तंटे सुरू आहेत. तहसील,न्यायालयाचे खेटे मारण्यात अनेक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळून आपापसात सलोखा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’ राबविलीआहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक,नोंदणी शुल्कात मोठी सूट दिली असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी ( SDM ) शरद झाडके व केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या वादावरून पिढ्यानपिढ्या असलेल्या वादाचे रूपांतर अनेकदा भांडण, हाणामारीत होऊन काहीवेळा टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत झाल्याच्या घटना अनेक घडल्या
आहेत. एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर तर, दुसऱ्याच्या जमिनीचा ताबा पहिल्याच्या नावावर असलेल्या जमीनधारकांचे दस्त अदलाबदल करण्यासाठी राज्य शासनाने तीन जानेवारी २०२३ पासून ‘सलोखा योजना’ राबविली आहे. या योजनेंतर्गत जमिनीच्या दस्ताची अदलाबदल करण्यासाठी मुद्रांक शुल्क केवळ एक हजार तर, नोंदणी शुल्क दोन हजार रुपये एवढे नाममात्र शुल्क ठेवण्यात आले आहे.ही योजना जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही शेतकऱ्यांचा एकमेकांच्या जमिनीवरील ताबा १२ वर्षांपासून असणे आवश्यक आहे.तसा ताबा असल्याबाबतचा पंचनामा तलाठी, मंडळ अधिकारी यांनी करून तो दस्त नोंदणीसोबत जोडणे बंधनकारक आहे. क्षेत्रफळातील बदल एकमेकाच्या सहमतीने करीत असल्याची नोंद दस्तमध्ये करणे आवश्यक आहे. ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठी असून अकृषक रहिवासी, व्यावसायिक वापराच्या जमिनीसाठी नाही. सदर योजनेमुळे आपापसातील वैर संपुष्टात येऊन ताबा, मालकीबाबत संभ्रम नाहीसा झाल्याने जमिनीच्या विकासाला चालना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनअंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी ( SDM ) शरद झाडके व केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांनी केले आहे.
जमिनीच्या ताब्याबाबत वर्षानुवर्षांपासून वाद असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाची ‘सलोखा योजना’ अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी शासनाने नोंदणी, मुद्रांक शुल्कही नाममात्र ठेवले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांनी केले आहे