राष्ट्रीय काँग्रेस केज तालुकाध्यक्ष पदी अमर पाटील

केज : खासदार सौ. रजनी पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अमर पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आज मंगळवारी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी निवडीचेपत्र दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार आपली केज तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे. तसेच मा. सोनिया गांधी, राहुल गांधी, राज्याचे प्रभारी, बीड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, खासदार रजनी पाटील हे भाजपा सरकारच्या जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या धोरणावर तसेच सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, भ्रष्टाचार या देशातील गंभीर विषयावर जागरुकता निर्माण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहेत. धर्मनिरपेक्ष व सर्वसमावेशक विकास करणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता पुन्हा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपणही कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी मेहनत घ्याल. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रात्र, दिवस मेहनत घ्याल अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. अमर पाटील यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या केज तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याची बातमी कळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.